विशेष प्रतिनिधी
नागपूर : प्रसिद्धीसाठी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी वादग्रस्त विधाने करत असतात असा टोला मारत वारी संदर्भात त्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. ( Chief Minister slams Abu Azmi for making controversial statements for publicity)
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनीकाही दिवसांपूर्वी त्यांनी मोगल बादशाह औरंगजेबाचे उदात्तीकरण करत त्याला चांगला शासक म्हटले होते. आता पुन्हा एकदा अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. अबू आझमी यांनी केलेल्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला वाटते की अबु आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याची आवड आहे. वादग्रस्त विधाने केली की प्रसिद्धी जास्त मिळते, असे त्यांना वाटते. त्यामुळेच मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही. त्यामुळेच मी या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.
आमदार अबू आझमी यांनी आज सोलापुरात माध्यमांशी बोलताना वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले. आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटे रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केले, तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितले लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते. याचा अर्थ जाणीवपूर्वक काही लोक मुस्लिम बाबतीत हे करत आहेत, असेही ते म्हणाले.