विशेष प्रतिनिधी
मुंबई : पानिपतचे कुठलेही स्मारक हे पराभवाची आठवण करून देणारे आहे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाड यांचा क्लास घेतला. पानिपत हा मराठ्यांच्या पराभवाचा नाही तर शाैर्याचा इतिहास आहे. पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदेंनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात फडकावला. या देशाकरिता मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झालेच पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. (Chief Minister took a class of Jitendra Avhad revealed the history of the heroism of the Marathas in Panipat war )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत येथे मराठयांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून स्मारक उभारण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांना पानिपत येथील स्मारकाची आठवण करून दिली. पानिपतचे कुठलेही स्मारक हे पराभवाची आठवण करून देणारे आहे. पानिपतात मराठे जिंकले नाही तर त्यांचा दारूण पराभव झाला, हा इतिहास पुसता येणार नाही. याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस स्मारक उभारणीचा पुनरुच्चार करताना म्हणाले, पानिपतची लढाई ही आमच्या शौर्याची लढाई आहे. मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. त्याचा बदला घेण्यासाठी पानिपतची लढाई झाली. ती लढाई मराठे जिंकलेच होते. या लढाईत मराठ्यांना कोणाचीच मदत झाली नाही, तरीही मराठे भारतासाठी लढले. पानिपतात गोलाची लढाई होती. पण दुर्देवाने गोल फुटला. तिथे पारडे अब्दालीच्या बाजूने झुकले. पण ही लढाई इथे संपत नाही. त्यानंतर महादजी शिंदेंनी 10 वर्षांनी दिल्ली पुन्हा जिंकली आणि एकछत्री अंमल आणला. अब्दालीला मराठ्यांनी इतके उध्वस्त केले होते की तो या देशात थांबलाच नाही, तो गावी परत गेला.
पानिपतच्या लढाईबाबत काही शल्य असेल पण आमचा पराभव झाला असे मी मानत नाही. पानिपतमधून ऊर्जा घेऊन महादजी शिंदेंनी छत्रपती शिवरायांचा भगवा देशात लावला. या देशाकरिता मराठे लढले. म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तयार झालेच पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.