विशेष प्रतिनिधी
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची सुकन्या दिविजा हिने दहावी बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे. ( Chief Ministers daughter scores 92.60 percent in 10th board exam)
अमृता फडणवीस यांनी X या सोशल मीडिया अकाउंटवर ही गुड न्यूज दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर कधी राहायला कधी जाणार? असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारण्यात येत होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना ते कधी राहायला जाणार याबद्दल सांगितले होते. ‘माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपल्यावर वर्षावर रहायला जाणार आहे. एकनाथ शिंदेंनी वर्षा सोडल्यावर मला तिथे जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी-मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी १० व्या वर्गात आहे, तिची परीक्षा सुरु होत आहे. ती म्हणाली परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होऊ. म्हणून मी काही शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यावर शिफ्ट होईन” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते.
दिवीजा ही मुंबईतील फोर्ट स्थित कैथेड्रल स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. यंदाच्या वर्षी तिने दहावी बोर्डाची परीक्षा दिली. या परीक्षेत तिला ९२.६० टक्के गुण मिळाले असून तिच्या पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.