विशेष प्रतिनिधी | श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळावर रिपोर्टिंगसाठी गेलेल्या एबीपी न्यूजच्या वरिष्ठ पत्रकार चित्रा त्रिपाठी यांना स्थानिक नागरिकांनी घेरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, त्यात त्रिपाठी या भीतीच्या छायेखाली आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाही, त्यांच्यावर ‘गोदी मिडिया हाय-हाय’ अशा घोषणांनी हल्लासदृश वातावरण निर्माण करण्यात आले.
( Chitra Tripathi surrounded by mob while reporting on Pahalgam attackVideo of Godi Media Hai Hai chanting goes viral)
व्हिडिओमध्ये चित्रा त्रिपाठी म्हणताना दिसतात, “मी पत्रकार आहे. मी फक्त माझं काम करत आहे,” परंतु उपस्थित जमाव त्यांच्याकडे दुर्लक्ष करत अपमानास्पद भाषेत बोलत राहतो. एक क्षणी त्रिपाठी म्हणतात, “तुम्हाला मारायचं असेल तर मारा, पण अशा प्रकारे वागू नका,” असे आवाहनही त्या करतात.
घटनेदरम्यान काहीजण ‘गुलिस्तान हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं’ अशा घोषणाही देताना दिसतात, तर काहीजण ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’ म्हणत शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, संपूर्ण परिस्थिती तणावपूर्ण होती.
या घटनेवर आसामचे मंत्री अशोक सिंगल यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “चित्रा त्रिपाठी यांच्यावर अक्षरशः लिंच करण्याचा प्रयत्न झाला. हीच खरी काश्मीर आणि काश्मिरीयतची असली ओळख आहे. भारतविरोधी मानसिकता असलेल्यांशी शांततेच्या चर्चेची अपेक्षा ठेवणेच चुकीचं आहे.”
ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीवास्तव यांनीही या घटनेचा निषेध केला असून म्हटले, “काल हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आले आणि आज जे पत्रकार हे सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही लक्ष्य केलं जात आहे. महिला पत्रकारांना घेरणं आणि ‘गोदी मिडिया हाय-हाय’च्या घोषणा देणं हे निषेधार्ह आहे.”
दरम्यान, पहलगाम हल्ल्यातून बचावलेले काही पर्यटक सांगतात की, दहशतवाद्यांनी धर्म ओळखण्यासाठी नाव विचारले, कपडे उतरवायला लावले आणि सुंता आहे की नाही हे पाहून हिंदू ओळखून गोळ्या झाडल्या. त्यामुळे हे हल्ले विशिष्ट समुदायावर हेतुपुरस्सर करण्यात आले होते, याची पुष्टीच त्या साक्षांमधून होते.
सोशल मीडियावर या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहीजण चित्रा त्रिपाठी यांचे धैर्य वाखाणत आहेत, तर काही जण माध्यमांनी ‘इस्लामी दहशतवाद’ या मुद्द्यावर फोकस केला म्हणून विरोध झाल्याचे सांगत आहेत.