पुणे: पर्वती पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत हरवलेले सहा लाख रुपये किमतीचे २० मोबाईल शोधून नागरिकांना परत केले. शनिवारी (दि. २६) परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचं हस्ते हे मोबाईल नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.( Citizens get their stolen mobile phones back)
वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारपेठा आणि इतर ठिकाणी मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी पर्वती पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस नाईक धायगुडे आणि पोलीस शिपाई खेडकर यांचे एक पथक नेमण्यात आले होते.
या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच प्रत्यक्ष संपर्क साधून कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून सहा लाख रु[यांचे हे २० मोबाईल हस्तगत केले. पोलीस उपयुक्तांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले.
अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, वरीष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धायगुडे आणि शिपाई खेडकर यांनी ही कारवाई केली.