पुणे : नियमबाह्य सोमाटणे टोलनाका तात्काळ बंद करावा, अन्यथा २२ जुलै पासून बेमुदत उपोषण करणार, असा इशारा स्वातंत्र सैनिक बाळासाहेब जांभूळकर आणि अन्य नागरिकांनी दिला आहे.
( Close illegal toll booths immediately otherwise indefinite hunger strike from July 22)
रस्ते परिवहन राजमार्ग मंत्रालय यांच्या राजपत्रानुसार सरकारी दप्तरी देहूरोड नावाने टोलनाक्याची नोंद आहे. परंतु सोमाटणे येथील टोलनाका उभारताना दोन टोल टोलनाक्यांतील किमान अंतर साठ किलोमीटर असणे, नगरपालिका हद्दीपासून दहा किलोमीटर अंतर असणे, स्थानिकांसाठी सेवा रस्ता करणे,
टोलनाक्याजवळ स्वच्छतागृह, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करणे व मुदत संपल्यानंतर टोलनाका बंद करणे आदींपैकी एकाही नियमाचे पालन होत नसल्याचा आरोप जांभूळकर यांनी केला आहे. उपोषणात जांभूळकर यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत कदम, अरुण माने, सचिन भांडवलकर, जमीर नालबंद, किशोर कवडे आदींनी सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.
यापूर्वी सोमाटणे टोलनाका बंद करण्याबाबत किशोर आवारे यांचे ११ डिसेंबर २०२३ रोजी उपोषण व १३ मार्च रोजी सोमाटणे येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह विविध संघटना, नागरिकांनी केलेल्या रस्ता रोको आंदोलनाची दखल घेऊन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावर उपाय योजना करू, असे आश्वासन दिले होते. त्याची पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. केवळ स्थानिकांना तात्पुरती टोलमध्ये सूट देऊन हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. असाही आरोप करण्यात आला आहे.