विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच पुण्यातील हल्ल्यात बळी गेलेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीला सरकारी नोकरीही दिली जाणार आहे. ( CM Devendra Fadnavis announces Rs 50 lakh assistance to families of six people killed in Pahalgam attack)
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी सरकार विशेष प्रयत्न करणार असून, त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीनेही विशेष काळजी घेतली जाईल.
मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकार वापरून संतोष जगदाळे यांच्या मुलीला थेट शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी जगदाळे कुटुंबीयांशी संवाद साधला होता. त्यांच्या मुलीला मदतीचे आश्वासन दिले होते. आता मंत्रिमंडळ बैठकीत अधिकृतपणे निर्णय घेण्यात आला आहे.
२२ एप्रिल मंगळवारी दुपारी, पहलगामच्या बैसरन व्हॅलीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांना थांबवून हिंदू कोण आणि मुस्लिम कोण याचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला आणि अजान म्हणायला लावले, त्यानंतर बळींवर थेट गोळ्या झाडल्या.
या भीषण हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा समावेश आहे. मृतांमध्ये देशभरातील विविध राज्यांतील पर्यटक होते, त्यापैकी महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील बळी गेलेल्या पर्यटकांत डोंबिवली येथील तीन मावस भावांचा समावेश आहे. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघे एकत्र कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी गेले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या नजरेसमोरच त्यांना गोळ्या घालून ठार मारले. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे दोघे बालमित्र आपल्या कुटुंबियांसह पहलगामला गेले होते आणि या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. दहशतवाद्यांनी डोक्यावर गोळी झाडून त्यांचा जीव घेतला. नवी मुंबई येथील दिलीप देसले यांचाही या दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.