विशेष प्रतिनिधी
पुणे: इतिहासाशी कोणतीही प्रतारणा न करता ऐतिहासिक स्वरूपाचा छावा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी होत आहे. पण महाराष्ट्राने 2017 पासूनच करमणूक कर रद्द केला आहे. करच नाही तर माफी कशी देणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ( There is a demand to make Chhava film tax free. But Maharashtra has abolished entertainment tax since 2017. Chief Minister Devendra Fadnavis said how to give amnesty if not tax.)
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट करमुक्त केला जावा अशी मागणी केली जात आहे. यावर फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, वीरता आणि विद्वत्ता प्रचंड होती. पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात करमणूक कर हा नेहमी करिता रद्द केला आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात करमणूक कर नाही. त्यामुळे अशी माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही,” असे फडणवीस म्हणाले. मात्र या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू.
ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं त्यांच्यावर अतिशय चांगला, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, निर्देशक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मनापासून अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान अभिनेता कमल खान यांनी केला होता. यावर फडणवीस म्हणाले की, “अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवू, अशा प्रकारे कोणी वागत असेल तर सरकारही माफ करणार नाही आणि शिवप्रेमीही माफ करणार नाहीत”.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतानाते म्हणाले की, “केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. १८ पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे शिवरायांनी शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे, सुरक्षा, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं. या सर्व आज्ञावलींचे पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचे काम महाराजांनी आम्हाला दिलं, शिवरायांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार आम्ही करत आहोत.