विशेष प्रतिनिधी
पुणे: एका पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी नसल्याची, हवा भरण्याची तसेच स्वच्छतागृहाची सोय नसल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पेट्रोल पंप चालकाला ६० हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. ( Company takes action against petrol pump in Lullanagar for not having toilet water air filling facilities;)
लुल्लानगर येथील कोंढवा रस्त्यावरील ‘ईश्वर सर्व्हिस स्टेशन’ या पेट्रोल पंपाच्या चालकाला भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने दंड ठोठवला आहे. नितीन ईश्वरलाल शाह असे या पेट्रोल पंप चालकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रफुल सारडा या नागरिकाने तक्रार केली होती.
सारडा म्हणाले, अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या मुलभूत सुविधांचा अभाव आढळतो. पेट्रोल पंप चालकांनी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याबद्दल माहिती देणरा फलक लावावा. तसेच संबंधित पेट्रोल कंपन्यांनी दर आठवड्याला पेट्रोल पंपांची पाहणी करावी. ते या पेट्रोल पंपाजवळच राहण्यास आहेत. त्यामुळे या ठिकाणीच ते पेट्रोल भरण्यासाठी जातात. मात्र या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि चाकात हवा भरण्याची सोय नियमित स्वरूपात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हवा भरण्याचे काम एका बाहेरील व्यक्तीला देण्यात आले होते. ती व्यक्ती हवा भरण्याचे पैसे घेत असे. या सगळ्या प्रकरची सारडा यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांकडे २६ फेब्रुवारी २०२५ ला तक्रार केली.
सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर कंपनीने पेट्रोल पंपाची पडताळणी केली. त्यावेळी पंपावर पुरेशा सुविधांचा अभाव असल्याचे कंपनीच्या लक्षात आले. त्यामुळे संबंधित पंपचालकाला ६० हजारांचा दंड ठोठावला. त्यामध्ये पाण्याची सोय, स्वच्छतागृह आणि कर्मचाऱ्यांचा गणवेश या गोष्टींवर दंड आकारण्यात आला.