विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी काँग्रेसने ‘गायब’ अशी पोस्ट X या सोशल मीडिया अकाउंटवर टाकली होती. मात्र ती पोस्ट प्रचंड वादग्रस्त ठरल्याने काँग्रेसला अखेर ती हटवावी लागली.
( Congress removes Gayab post after heavy criticism)
काँग्रेसने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये “जब जिम्मेदारी का समय आया तो गायब” असा उल्लेख करत एका चेहराविना फोटो दाखवला होता. भाजपने या पोस्टची तुलना ‘सर तन से जुदा’ प्रकारच्या चिथावणीखोर प्रतिमेशी केली आणि काँग्रेसवर थेट पंतप्रधानांविरुद्ध हिंसाचार भडकावल्याचा आरोप केला.
भाजपने काँग्रेसवर आरोप केला की, त्यांनी पाकिस्तानच्या प्रोपगंडाला बळ देणारे कृत्य केले आहे. काँग्रेसची ही बालिश कृती त्यांच्या राजकीय दिवाळखोरीचे आणि मुस्लिम मतपेढी सांभाळण्याच्या घातक प्रयत्नांचे दर्शन घडवते.
याआधीही काँग्रेस नेत्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून वादग्रस्त वक्तव्य करून पाकिस्तानच्या अजेंडाला चालना दिली होती. हल्लेखोरांनी हिंदू पर्यटकांना ओळखून लक्ष्य केल्याच्या नातेवाईकांच्या जबाबांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने बळी पडलेल्यांच्या वेदनांनाच कमी लेखले होते.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसच्या या कृत्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “ही केवळ एक राजकीय टीका नसून काँग्रेसने मुस्लिम मतपेढी सांभाळण्यासाठी दिलेला एक चिथावणीखोर संकेत आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा भारतविरोधी राजकारणाचा नीच पातळीवर जाऊन प्रयोग केला आहे. तरीही काँग्रेसचा हा डाव यशस्वी होणार नाही, कारण पंतप्रधान मोदींना कोट्यवधी भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभले आहेत.”
मालवीय पुढे म्हणाले, “प्रत्यक्षात कोणाचा ‘सर तन से जुदा’ झाला आहे, तर ती काँग्रेस आहे . आज दिशाहीन, नेतृत्वशून्य अवस्थेत फडफडत आहे.”
भाजप नेते आर. पी. सिंग यांनी देखील काँग्रेसवर घणाघाती टीका करत “पाकिस्तान के यार” अशी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये राहुल गांधींना एक सुरा हाता मागे लपवून ठेवलेल्या व्यक्तीप्रमाणे दाखवले असून काँग्रेस देशाशी गद्दारी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.