विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करतानाचे फोटो पाहून राज्यभरातून उसळलेली संतापाची लाट पाहून महायुती सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. मात्र आपण सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने राजीनामा दिल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. (Conscientiousness and ill health, Dhananjay Munde gives reasons for resigning)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन करावे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी तीव्र झाली होती. त्यांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यामागची करणे मुंडे यांनी सांगितली आहेत. धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजीनामा दिल्यानंतर मुंडे यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे कि ,
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नैतिकतेवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.