विशेष प्रतिनिधी
पुणे : घोरपडी येथे उड्डाणपुलाच्या बांधकामस्थळी पाण्याने भरलेल्या खड्यात पडून ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी (२९ मार्च) या खड्यात त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
( Construction pitclaims childs life nineyearold boy dies after falling into waterfilled pit under Ghorpadi flyover)
कृष्ण सुभाष अंगरकर (९) असे या मुलाचे नाव आहे. तो पुणे कॅन्टोन्मेंटमधील खान रोड, गुरुद्वारा परिसरात राहणारा होता. घोरपडीतील स्थानिक शाळेत चौथी वर्गात शिकणाऱ्या कृष्णला शुक्रवारी शाळेनंतर आपल्या मोठ्या भावासोबत घरी जाण्याचे होते. मात्र, तो न आल्याने त्याचा भाऊ घरी परतला.कृष्ण घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबियांनी शाळेतील मित्र व परिसरात शोधाशोध सुरू केली. अनेक प्रयत्न करूनही तो सापडला नाही. अखेर शनिवारी दुपारी त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या भावाची शाळा मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी एकत्रित शोधमोहीम हाती घेतली.
कृष्ण बांधकामस्थळी असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्यात पडला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहोचले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोटार पंपांच्या मदतीने पाणी उपसण्यात आले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर कृष्णचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बांधकामस्थळी लोखंडी जाळीचे पाच-सहा फूट उंच बॅरिकेडिंग होते, मात्र त्याच्या तळाशी सुमारे एक फूट अंतर मोकळे होते. कृष्ण कुतूहलाने त्यातून आत सरकला असावा आणि तोल जाऊन खड्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शाळेची पिशवी व पुस्तके पाण्यावर तरंगताना पाहून कृष्णच्या पालकांचे दुःख अनावर झाले. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून ठेकेदाराच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. रविवारी मुंढवा पोलीस ठाण्यात संबंधित ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलकंठ जगताप यांनी दिली.