विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून, बिहारमधील विधानसभा मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरावलोकन (Special Intensive Revision – SIR) या मुद्यावरून संसद भवनात मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षातील खासदारांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरून निषेध नोंदवला. त्यांनी काळ्या कपड्यांचे झेंडे आणि वस्त्र दाखवून आपला आक्रोश व्यक्त केला. (Controversy in Parliament over Bihar voter listsOpposition aggressive)
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वारंवार शांतता राखण्याचे आवाहन केले. “रस्त्यावरची आंदोलन पद्धती संसदेत चालणार नाही. देशातील जनता सर्व पाहते आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र गोंधळ सुरुच राहिल्यामुळे, लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी १२ पर्यंत, त्यानंतर पुन्हा दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आले.
दरम्यान, संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर विरोधी पक्षांनी निदर्शने केली. या निदर्शनात काँग्रेस नेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत, अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन हे सर्व उपस्थित होते. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी आपल्या गळ्याभोवती काळे कपडे घालून तीव्र विरोध दर्शविला.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत या प्रकरणावर घटनात्मक आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित चर्चेची नोटीस दिली असून, त्यावर आज किंवा लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, “महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ करण्यात आले आहेत. कर्नाटकात देखील आयोगाने असाच प्रकार केला आहे. आता बिहारमध्येही तसेच होण्याची शक्यता आहे. आम्ही न्यायालयात सर्व पुरावे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सादर करू.”
24 जून 2025 रोजी निवडणूक आयोगाने बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विशेष गहन पुनरावलोकन करण्याची घोषणा केली होती. यामध्ये स्थानिक प्रशासनाने मतदारांची पुन्हा नोंदणी, मृत/दुहेरी नावे हटवणे आणि नवीन मतदार समाविष्ट करणे यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु विरोधकांचा आरोप आहे की, या मोहिमेचा गैरवापर करून मतदार यादीत इच्छित बदल करून निवडणुकीच्या पारदर्शकतेला धोका पोहोचवला जात आहे.