विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर लिहित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ या नाटकाच्या पुण्यातील प्रयोगाच्या दरम्यान गौतम बुद्धांच्या बाबतीत चुकीचा वाक्यप्रयोग केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीकडून नाटक सुरू झाल्यावर गोंधळ घालण्यात आला. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा प्रकार घडला. ( Controversy Over Savarkars Play Sangeet Sannyast Khadga Vanchit Bahujan Aghadi Alleges Disrespectful Remark About Gautam Buddha)
या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग आज (शनिवार, 12 जुलै) होता. सात्यिकी सावरकर यांनी आयोजित केलेल्या नाटकामध्ये त्याचवेळी खासदार मेधा कुलकर्णीही नाट्यगृह आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.
या नाटकात गौतम बुद्धांच्या शांततेचा मार्ग चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला, असा आरोप ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनी नाटक पूर्णपणे बंद पाडण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी 6 वाजता हे नाटक सुरु झालं होतं. अडीच तास नाटक चालल्यानंतर गोंधळ सुरु झाला. नाटकातील काही संवादावरही या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.
भाजपा खासदार मेधा कुलकर्णी या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित होत्या. त्यांनी आमच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. कुलकर्णी यांनी या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
आम्ही हे नाटक पूर्णपणे पाहिले आहे. नाटकात खोटी माहिती दाखवली आहे. आम्ही हे नाटक चालू देणार नाही. आयोजकांवर कारवाई व्हावी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चुकीचे लिहिले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.