विशेष प्रतिनिधी
बारामती : खंडित झालेला वीज प्रवाह अचानक सुरळीत झाल्यानंतर घरातील पंख्याला शॉर्टसर्किट होऊन विज प्रवाहाच्या धक्क्याने झोपेत असतानाच पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील सांगवी येथे घडली. ( Couple dies of electric shock after power surge hits house)
बुधवारी पहाटे अवकाळी पावसामुळे अचानकपणे वीज खंडित झाली, पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाला असता वीज प्रवाह घरात उतरला . यामुळे पंखा खाली ठेवलेल्या ठिकाणी झोपलेल्या पती-पत्नीला विजेचा धक्का बसला आणि झोपेतच दोघांचाही मृत्यू झाला. नवनाथ रामा पवार (वय 40) व त्यांच्या पत्नी संगीता नवनाथ पवार (वय 38 ) असे मृत्यू पावलेल्या दांपत्याचे नाव आहेत.पवार दांपत्याला दोन मुले तर एक मुलगी आणि नातवंडं असा हसता खेळता परिवार होता. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. स
सकाळी हे जोडपे उशिरा पर्यंत उठले नसल्याने नातेवाईकांना शंका आली. खिडकीतून पाहिले असता पंख्याच्या वीजेचा धक्का लागल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी दार तोडून पंख्याचा वीजप्रवाह बंद करून दोघांचा मृतदेह बाहेर काढला,दरम्यान घटनास्थळी माळेगाव पोलिसांनी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला. ही घटना कशामुळे नेमकी घडली याबाबत वीज वितरणच्या तांत्रिक तज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे.