विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावित नवीन इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आयुक्तालयातील कार्यालयांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने हे स्थलांतर होणार असून, शेवटच्या टप्प्यात मुख्य इमारतीतील कार्यालये स्थलांतरित केली जातील. ( Pune Police Commissionerate to be relocated, work on proposed new building to begin soon)
वाढती लोकसंख्या पाहता पोलिसांवर कामाचा ताणही वाढत आहे. काम वाढल्याने सद्यस्थितीतील पोलिस आयुक्तालयाची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे विस्तारीत आणि आधुनिक सोईसुविधांनी युक्त इमारतीची आवश्यकता भासू लागली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयासाठी नवीन इमारत बांधण्याचे नियोजित आहे. आयुक्तालयाच्या सध्याच्याच जागेवर टप्प्याटप्प्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर ही इमारत
उभारण्यात येणार आहे. त्याचे काम आता सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील कार्यालयांच्या स्थलांतराचे काम हाती घेतले आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या सध्याच्या जागेवरच नवीन इमारत उभारली जाणार आहे.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर पोलिस आयुक्तालयाची ‘ग्रीन बिल्डिंग’ असेल. या कामासाठी गृह विभागाने १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या 66 नवीन इमारतीच्या
उभारणीसाठी दोन ते तीन दिवसांत काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठी आयुक्तालयातील कार्यालयांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतरण केले जाणार आहे, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त ( प्रशासन) अरविंद चावरिया यांनी सांगितले.
पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त, सहआयुक्त यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये, यासोबतच गुन्हे शाखा, विशेष शाखा, परकीय नागरिक नोंदणी, प्रशासन आदी शाखांची कार्यालये आहेत. ‘भरोसा सेल’ व नागरिक सुविधा केंद्रही आहे. पहिल्या टप्प्यात भरोसा सेल, नागरिक सुविधा केंद्र, प्रेस रूम स्थलांतरित केले जाईल. त्यानंतर गुन्हे शाखेची कार्यालये अन्यत्र हलवली जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
तळमजला अधिक पाच मजले अशी नवीन इमारत असणार आहे. कार्यालयीन कामकाजाच्या गोष्टींसह नागरिकांसाठी ‘वेटिंग लाउंज’, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी व्यायामशाळा, सभागृह, सौरऊर्जा प्रणाली, मैलापाणी शुद्धीकरण केंद्र यांचा समावेश आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही कक्ष, शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात स्थलांतरित केला जाणार आहे. त्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला आयुक्तालय बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या परिसरात कार्यरतहोते. त्यानंतर सध्याच्या आयुक्तालयातील ब्रिटिशकालीन वास्तूमधून आयुक्तालय चालविण्यात आले होते. १९७६मध्ये आयुक्तालयासाठी नवीन इमारत उभारण्यात आली. त्याच इमारतीतून सध्या आयुक्तालय चालविले जाते. यंदा इमारतीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. अलीकडील काळात पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या कार्यकाळात आयुक्तालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले होते.