विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वत:ला पोलिस निरीक्षक म्हणून भासवणाऱ्या सायबर ठगाने कर्वेनगरमधील ७६ वर्षीय महिलेला मनीलॉंड्रिंग प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत तब्बल २१ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( Cyber fraudster posing as police inspector robs senior woman of Rs 21 lakh fears of being implicated in money laundering case)
फिर्यादी महिला आपल्या मुलासोबत कर्वेनगरमध्ये राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन कॉल आला. फोनवरचा इसम “मी डीओसीमधून बोलतोय” असे सांगून त्याने महिलेला विश्वासात घेतले. त्यानंतर तुमच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने ते मनी लॉंड्रिंगसाठी वापरले आहे, असे सांगून त्या गुन्ह्यात अटक होऊ शकते असे सांगण्यात आले.
यानंतर त्यांचा कॉल नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्याशी जोडला जात असल्याचे भासवले गेले. कॉलवर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला पोलीस निरीक्षक पिसे असल्याचे सांगितले. त्यांनी महिलेला तिच्या आधारकार्डची चौकशी करत, घरी कोण कोण आहे, अशी वैयक्तिक माहिती विचारून भीती निर्माण केली. “तुम्हाला केसमधून वाचवण्यासाठी आम्ही मदत करू, पण कोणालाही याबाबत काही सांगायचं नाही,” असेही बजावण्यात आले.
दुसऱ्या दिवशी महिलेला व्हिडिओ कॉल आला, ज्यामध्ये पोलीस गणवेशातील एक व्यक्ती पोलिस निरीक्षक पिसे असल्याचे सांगून महिलेच्या बँक खात्यांची आणि मुदत ठेवांची माहिती घेतली. त्यानंतर महिलेने बँकेतून सर्व मुदत ठेवी मोडून एकूण आठ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २१.६५ लाख रुपये हस्तांतरित केले.
महिलेने पैसे परत कधी मिळतील, अशी चौकशी केली असता, “चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील,” असे सांगण्यात आले. काही दिवसांनी महिलेने ही माहिती आपल्या ओळखीच्या व्यक्तीस सांगितल्यावर त्याने यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी अलंकार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सध्या पोलिसांकडून सायबर चोरट्यांचा तपास सुरू आहे. नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.