विशेष प्रतिनिधी
पुणे : मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्टची भीती घालून ज्येष्ठाला सहा कोटी २९ लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्याला पोलिसांनी पनवेल येथून सापळा लावून अटक केली. ( Cyber thief arrested for duping senior citizen of Rs 6 crore by fearing digital arrest)
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठाला ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विरोधात मनी लॉंड्रिंगची केस असल्याचे सांगितले. तसेच चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठाने वाजंत्री याला तब्बल सहा कोटी २९ लाख रुपये पाठविले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू असताना ११ नोव्हेंबर २०२४ रोजी २० लाखांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपीने ९० लाख आणि २० लाख रुपयांची एफडी केली. हे बँक खाते कोकबन येथील श्री. धावीर कन्स्ट्रक्शन यांचे असल्याचे उघड झाले. तर आरोपी हे बांधकाम व्यवसायिक असल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहोचले. मात्र आरोपी साथीदारासह तिथून पसार झाले. आरोपी पनवेल मध्ये असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार अद्याप फरार आहे.
पाच गुन्हे उघडकीस
आरोपी तुषार वाजंत्री याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर एकूण पाच तक्रारी आहेत. या पाच गुन्ह्यात वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. केरळ पोलीसही या आरोपींच्या मागावर होते. सायबर पोलीस केरळ पोलिसांच्या संपर्कात राहून या आरोपींचा शोध घेत होते. पोलीस वाजंत्रीच्या साथीदाराचा शोध घेत आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासो चव्हाण, जानवी भडेकर, संदिप पवार, संदिप यादव, सचिन शिंदे, सतिश मांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.