विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात लष्करातील विंग कमांडरच्या घरावर दरोडा पडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरोडेखोरांनी झोपेतून उठवून हातोड्याच्या धाकाने त्यांच्याकडून कपाटाच्या चाव्या घेतल्या. ४० तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख लुटून नेले. ( Daring Robbery at Air Force Wing Commanders Residence in Pune Gold and Cash Worth Lakhs Stolen)
जांभुळकर चौकातील कौशल्या बंगल्यात लष्कराचे विंग कमांडर वीरेंद्र कुमार झेंडियाल यांच्या घरात पहाटेच्या सुमारास हा दरोडा पडला. पहाटे अंदाजे २.३० ते ३ च्या सुमारास दोन अज्ञात चोरटे झेंडियाल यांच्या बंगल्यात घुसले. झोपेत असलेल्या विंग कमांडर यांच्या बेडरूममध्ये घुसून त्यांच्या तोंडावर हात ठेवत त्यांना जागे केले. सोन कुठे ठेवले आहे, अशी विचारणा करत धमकी दिली की जर हालचाल केली तर परिणाम वाईट होतील. चोरट्यांच्या हातात हातोडा, हेक्सा ब्लेडसारखा रॉड होता.विंग कमांडर यांच्या कपाटाची चावी हिसकावून घेत त्यांनी कपाट उघडले व त्यातील तब्बल ४० तोळे सोने आणि साडेआठ लाख रुपये रोख चोरून नेले. काही क्षणातच दरोडेखोर पसार झाले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.