विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे महिलांना पोलीस असल्याचे भासवून फसवायचा अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ( Dattatray Gade used to deceive women by pretending to be a policeman, photos found in his mobile phone)
गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दत्तात्रय गाडे याला गेल्या वर्षी स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांच्या वेषातील फोटो आढळला आहे. पोलीस भरतीबाबत आपण मार्गदर्शन करु शकतो, असं सांगत गाडे तरुणींच्या संपर्कात येत होता. गाडे याने पोलिसांचा गणवेश कुठून आणला याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. त्याच्याविरोधात सहा गुन्ह्यांची नोंद आहे.
दत्तात्रय गाडे हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या परिसरात फिरायचा. कधी एसटी कंडक्टर आहे, तरी कधी पोलीस असल्याचे सांगून तरुणींना भासवायचा आणि फसवायचा अशी माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपीची दोन वर्षांतली फोनची कुंडली काढली असून, त्यात त्याचा स्वारगेट बस स्थानकच नव्हे, तर शिवाजीनगर, पुणे स्टेशन, शिरूर, अहिल्यानगर आणि सोलापूर बस स्थानक परिसरात मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे. इतर बस स्थानकांच्या तुलनेत तो स्वारगेट बस स्थानकातच अधिक काळ वावरला असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनचा परिसर ही गर्दीची ठिकाणे त्याने हेरली होती. या परिसरात महिला आणि पुरुष प्रवाशांची सतत वर्दळ असते. याच संधीचा फायदा घेऊन गाडे हा गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी गाडेची कुंडली काढली असून, त्या अनुषंगाने पोलिस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गाडे याने फलटणला जाणाऱ्या एका तरुणीवर पहाटे शिवशाही बसमध्ये बलात्कार केला होता. त्याला पोलिसांनी अटक केली असून सध्या पोलीस कोठडीत तपास सुरू आहे.