पुणे : मुलाच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन सुनेने त्याच्या बँक खात्यातून एक कोटी ४० लाख रुपये लंपास केल्याची तक्रार सासूने सूनेविरुद्ध दिली आहे. ( Daughter-in-law embezzled Rs 1.4 crore, mother-in-law files complaint)
मानसी मिलिंद देशपांडे (वय ५३, रा. कर्वेनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या सुनेचे नाव आहे. वृंदा मुकुंद देशपांडे (वय ८४, रा. नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वृंदा देशपांडे या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा मिलिंद हा इंजिनियर होता.त्यांचा खाजगी व्यवसाय होता. मिलिंद आणि त्यांची पत्नी मानसी हे एकमेकांपासून विभक्त राहतात. मानसी एका शिक्षणसंस्थेत क्लर्क म्हणून कामास आहे. मिलिंद हे आजारी असून आपल्या आईसोबत राहतात. मिलिंद आणि मानसी यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिकत आहेत.
मिलिंद यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे व्हीलचेअरवर बसून असतात. त्यांची पत्नी मानसी देशपांडे हिने मिलिंद यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला. मिलिंद आजारी असताना मानसीने कोणाचीही परवानगी न घेता इंटरनेट बँकिंगचा वापर करून एक कोटी ४० लाखांची रक्कम मिलिंद यांच्या बँक खात्यातून स्वत:च्या बँक खात्यात वर्ग करून घेतली. हा सगळा प्रकार जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या दरम्यान घडला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मिलिंद यांची आई वृंदा देशपांडे यांनी आपल्या सूनेविरूद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अलंकार पोलिसांनी मानसी देशपांडे हिच्या विरूद्ध आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलीस निरीक्षक अनिल माने पुढील तपास करीत आहेत.