विशेष प्रतिनिधी
बुलडाणा: भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्यातील मंत्री आणि आमदारांची सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे शिंदे गट आक्रमक झालेला आहे. त्यातच आता भाजपच्या महिला आमदारांना धमकीचे पत्र आले आहे.
श्वेता महाले यांना धमकीचे पत्र आल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. श्वेता महाले या भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील आमदार आहेत. त्यांना धमकीचे पत्र देण्यात आले आहे. श्वेता महाले यांनी आज दुपारी समर्थकांसह चिखली पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली आहे.
आमदार श्वेता महाले यांना दिलेल्या धमकीच्या पत्रात आक्षेपार्ह्य भाषेचाही वापर करण्यात आला आहे. हे पत्र कोणी आणि का पाठवले हे अद्याप समजू शकले नाही. श्वेता महाले यांनी या धमकी पत्राबद्दल म्हटले आहे की, इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या त्यांनाही कोणी वाचवू शकले नाही, तू तर साधी आमदार आहे. कितीही सुरक्षा घेतली तरी सोडणार नाही, असे धमकी पत्रात म्हटल्याचे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.