विशेष प्रतिनिधी
पुणे : खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवार यांच्याकडे दिलेला राजीनामा ते स्वीकारतात का याकडे लक्ष आहे. ( Deepak Mankar submitted his resignation from the post of city president to Ajit Pawar.)
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करुन पोलीसांची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शंतनू कुकडेला (Shantanu Kukde) पुणे पोलीसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलीसांनी शंतनू कुकडे याच्या बँक खात्यांची पडताळणी केली. त्यावेळी शंतनू कुकडे आणि दिपक मानकर (Deepak Mankar) यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते.
काही समाजकंटकांकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे . जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा फसवणूक झालेली नाही, असे मानकर म्हणाले.
या प्रकरणामुळे पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे
तरी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा, असेही मानकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार दिपक मानकर यांचा राजीनामा मंजूर करतात का याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.