विशेष प्रतिनिधी
मुंबई : मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना निकालामुळे शहाणपण आले असेल. गद्दार, गद्दार म्हणत भुई ठोकत बसा. तुम्हाला दार बंद करून पक्षाचे दुकान बंद करावे लागेल, असा इशारा देत सुपारी देऊन बदनामीच्या मोहिमा चालविल्या जात आहेत, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. ( Defamation campaigns by giving SupariEknath Shinde attacks Uddhav Thackeray)
कुणाल कामरा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, गद्दार कोण? याचा निकाल निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. पण, जनतेच्या न्यायालयात सुद्धा गद्दार कोण? खुद्दार कोण? याचा निकाल दिला आहे. सुपारी देऊन बदनामीच्या मोहिमा चालवल्या जात आहेत. काही पाखंडी लोक पुढे करून शिखंडी लोक आधार घेत आहेत.
आरशात पाहून वारसा सांगता येत नाही. प्रत्येक कामात रिझन देण्याऱ्यांचा सिझन आम्ही संपवला. आम्ही विकासाची तुफान बॅटिंग केली. आमच्या स्कोरच्या पाठलाग करताना विरोधक क्लीनबोल्ड झाले. आमच्या टीमची नवीन इनिंग सुरू झाली आहे. आमची बॅटिंग टी-२० सारखी आहे. कमी चेंडूत जास्त रन काढण्याचे काम करतो आहे. विरोधकांनी आमची चिंता करण्याची गरज नाही. स्वत:ची काळजी करण्याची गरज आहे. अडीच वर्षे रोज आरोप केले जातात. मात्र, घरी बसणाऱ्यांना पुन्हा घरी बसवले. काम करणाऱ्यांना सत्ता दिली. रोज शिव्या-शाप देऊन भले होत नसते. दुसऱ्यांची लाईन कापण्यापेक्षा आपल्या कामाची लाईन मोठी करा. आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करा. गरींबाविषयी तुमचा कळवळा किती खरा-खोटा आम्हाला माहिती आहे.
कविवर्य सुरेश भट यांच्या शब्दांत सांगायचे तर, ‘मोठे हसू, खोटे रडू, खोटीच ही संभाषणे. गरीबांच्या तोंडची खिचडी खाणारे.’ तुमचा खोटारडेपणा सगळ्यांना कळून चुकला आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता…,’ ‘जो हम तक पहुंच नहीं सकते वो हमें क्या गिराएंगे, हमारे दुश्मनों से कहो अपना कद ऊँचा करें बराबरी होगी, तोही मुकाबले मैं मजा होगी,’” अशी शेरोशायरी करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना आव्हान दिले आहे.