विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) अभूतपूर्व विजय मिळवत तब्बल २७ वर्षांनी सत्ता मिळवली आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप ७० पैकी ४१ जागांवर आघाडीवर आहे. (BJP on its way to historic victory in Delhi assembly elections, ‘Aap’ suffered defeat, Congress could not even crack a pumpkin)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक प्रचारामुळे आणि पायाभूत सुविधा, प्रदूषण आणि भ्रष्टाचार यासारख्या स्थानिक मुद्द्यांवर भर दिल्यामुळे भाजपला आम आदमी पक्षाच्या “केजरी-वाल” ला भेदणे शक्य झाले. परवेश वर्मा विरुद्ध अरविंद केजरीवाल (नवी दिल्ली मतदारसंघ) आणि कालकाजी (रामेश बिधुरी विरुद्ध मुख्यमंत्री आतिशी) यासारख्या प्रमुख जागांवर भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. केजरीवाल यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. आतिशी यांची जागाही धोक्यात आहे
२०१५ पासून दिल्लीवर वर्चस्व गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) मोठा फटका बसला असून पक्ष २९ जागांवर पिछाडीवर आहे. अरविंद केजरीवाल स्वतः नवी दिल्ली मतदारसंघात सुरुवातीच्या फेऱ्यांनंतर पिछाडीवर गेले आहेत.
आपच्या पराभवाचे कारण म्हणून आर्थिक गैरव्यवहार (उदा. दारू धोरण वाद), मोफत सेवा देण्याच्या योजनांवरील विश्वास आणि प्रशासन चालविण्यातील अपयश सांगितले जात आहे.
काँग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, मात्र एकही जागा जिंकण्यात यश आले नाही. त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन झाले. आप आणि काँग्रेसमध्ये आधीच युती झाली असती, तर भाजपला रोखणे शक्य झाले असते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना सांगितले, “आप आणि काँग्रेसने इंडिया आघाडीच्या नावाखाली एकत्र निवडणूक लढवली असती, तर भाजपचा पराभव निश्चित होता.”
२०१३ पासून काँग्रेसचा प्रभाव दिल्लीतील मतदारांमध्ये जवळपास संपुष्टात आल्यामुळे त्याचा फटका आपच्या मतपेढीला बसला, असेही सांगण्यात येत आहे.
यावेळी भाजपने फक्त राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्याऐवजी दिल्लीतील स्थानिक समस्या उदा पाणीटंचाई, खराब रस्ते आणि कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे भाजपने शहरी मतदारांना आकर्षित केले
२०१५ पासून दिल्ली विधानसभेत एकही जागा जिंकता न आल्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक आणखी मोठा धक्का ठरली आहे. काँग्रेसच्या स्वतंत्र लढतीमुळे विरोधी मतांचे विभाजन झाले आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणे सोपे झाले.