विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषी मंत्री विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो हे चित्र महाराष्ट्राची लाज वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मंत्र्यांना कशाचेच भान नाही आणि आमदार व पदाधिकारी गुंड, मवाली बनलेत परंतु मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या माजलेल्या लोकांना वेसन घालू शकत नाहीत. कारवाई फक्त विरोधी पक्षांवर करण्याची मर्दुमकी दाखवणाऱ्यांनी निर्ल्लज कृषी मंत्री व गुंडगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची धमक दाखवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ( Demand of Harshvardhan Sapkal, the NCP office bearer who committed hooliganism should be scolded)
सरकारवर हल्लाबोल करताना सपकाळ म्हणाले की, विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या हाणामारीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, की आमदार माजलेत पण आमदारच नाही तर मंत्री व पदाधिकारीही माजले आहेत हे त्यांना दिसत नाही का? कृषीमंत्री कधी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात तर कधी कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी मुलांची लग्न करतात म्हणून अपमान करतो आणि आतातर हे महाशय चक्क विधानसभेत रमी खेळत बसले होते. या घटनेचा निषेधार्थ करताना छावा संघटनेने लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना निवेदन देत पत्ताच्या सेट दिला, हा निषेध करण्याचा मार्ग आहे, त्यात चुकीचे काय? पण अजित पवारांच्या पाळलेल्या गुंडांनी त्या आंदोलकांना बेदम मारहाण केली, हा माज कशातून येतो? सत्ता यांच्या डोक्यात गेली आहे, पण सत्तेची ही नशा जास्त काळ रहात नाही. या प्रकरणाचा आता निषेध केला जात आहे पण असा पोकळ निषेध काय करता? कृषी मंत्र्याला घरी पाठवा आणि या माजलेल्या सडकछाप गुंडांना जेलमध्ये खडी फोडण्यासाठी पाठवा, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..
हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात अडकला…
राज्यातील काही मंत्री व अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसने विधानसभेत केला पण राज्याचे मुख्यमंत्र्यांनी, असे काहीच घडले नाही अशा राणाभीमदेवी थाटात निवेदन केले. पण सवयीप्रमाणे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलले. या हनी ट्रॅपचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळ पोहचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत निकटच्या मंत्र्याबरोबर हनीट्रॅपशी संबंधित व्यक्तीचा फोटो झळकल्याने या प्रकरणातील गांभिर्य अधिकच गडद झाले आहे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे पण हनी ट्रॅपची उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.