विशेष प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मराठी बोलत नसल्यावरून एका दुकानदाराला केलेल्या मारहाणीवरून बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीने संताप व्यक्त केला आहे.
‘हे घृणास्पद आहे. राक्षसं मोकाट फिरत आहेत. लक्ष वेधण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी ते असं करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?’ असा सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. ( Demons are roaming freeActor Ranvir Shorey is angry with MNS for beating up a shopkeeper.
रणवीरच्या या पोस्टवरून काही नेटकऱ्यांनी त्याचं समर्थन केलंय, तर काहींनी त्यालाच प्रतिप्रश्न विचारला आहे. तुम्ही महाराष्ट्रात किती वर्षांपासून राहत आहात, मराठी शिकण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले, असा सवाल एका युजरने केला. त्यावर रणवीरनेही उत्तर दिलं आहे.
मुंबईतील मीरा रोड भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका रेस्टॉरंटच्या मालकाला मराठीत बोलला नाही म्हणून मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. संबंधित दुकानदाराला मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर करत रणवीरने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर लिहिले आहे.
मनसे कार्यकर्त्यांचा रणवीरने सोशल मीडियावर तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेवरून संताप व्यक्त करत त्याने मनसे कार्यकर्त्यांची कृती लज्जास्पद असल्याचेही म्हटले आहे.
यावरून रणवीरला काहींनी प्रश्नही केले. त्यांना उत्तर देताना रणवीरने म्हटले आहे की, सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्यासारख्या अनोळखी लोकांना प्रत्युत्तर देणार नाही, जे द्वेष पसरवतात. दुसरं म्हणजे, जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांना मारहाण करून भाषा शिकवता येते, तर तुम्ही खूप चुकीचे आहात. शेवटची गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला या मुद्द्याकडे लक्ष वेधायचं असेल, तर फक्त आपली उपजीविका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असहाय्य लोकांना मारहाण करण्यापेक्षा इतर मार्ग निवडा. राजकीय फायद्यासाठी निषेध करण्याचे अधिक सकारात्मक आणि रचनात्मक मार्ग आहेत.
व्हायरल व्हिडीओत पहायला मिळतंय की रेस्टॉरंटचा मालक म्हणतोय, “मराठीची सक्ती असल्याचं मला माहीत नाही. मला कुणीतरी मराठी भाषा शिकवा, मी मराठीत बोलेन.” त्यावरून मनसेचे तीन कार्यकर्ते त्याच्याशी वाद घातलाना दिसत आहेत. “हा महाराष्ट्र आहे, मग तुला मराठीतच बोलावं लागेल. तू कुठल्या राज्यात व्यवसाय करतोस”, असा प्रश्न एकाने रेस्टॉरंट मालकाला विचारला. त्यानंतर त्यांनी थेट त्याला मारायला सुरुवात केली. विशेष म्हणजे मनसेचे हे सगळे कार्यकर्ते त्या रेस्टॉरंट मालकाला हिंदीत बजावून सांगत होते की, मराठी में बोल.