विशेष प्रतिनिधी
पुणे : दौंड तालुक्यातील वाखारी इथल्या न्यू अंबिका या कला केंद्रात गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर मकोका लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. ( Deputy Chief Minister Ajit Pawars suggestion to impose MCOCA on the accused in the shooting case at the art center)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाने हा गोळीबार केल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आमदाराच्या भावासह तिघांना अटक केली.
वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री साडेदहा ते ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र हे प्रकरण वाढत गेल्याने भोर-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. कैलास उर्फ बाळासाहेब हिरामण मांडेकर याने नाचताना बंदूक काढून हवेत गोळीबार केला होता. गणपत जगताप, बाळासाहेब मांडेकर, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवार यांनी या प्रकरणी माध्यमांशी बोलताना या प्रकरणातील आरोपींवर जमल्यास मकोका लावा अशा सूचना दिल्या आहेत.
अजित पवार म्हणाले, दौंड प्रकरणावर मी पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. तिथे कुणीही जखमी झालेलं नाही. त्या ठिकाणी गोळीबार झाला. ते बघून एक महिला बेशुद्ध पडली. तिला पाणी देऊन शुद्धीवर आणलं. या प्रकरणात कुठलाही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका अशा सूचना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दिल्या आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या प्रकरणात जी नावं समोर येतील त्यांना अटक करा, ते कुणाच्याही संबंधित असू द्या. तो आमदार शंकर मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही. तो चुलत भाऊ असण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टींचा तपास करण्यास सांगितलं आहे.