विशेष प्रतिनिधी
पिंपरी : राजकारणी आणि यांच्या संबंधांचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि गुन्हेगार आकाश मोहोळ ऊर्फ आक्या बाँड एकमेकांना केक भरवत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आक्या बाँड याच्यावर १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ( Deputy Speaker Anna Bansode celebrates with notorious criminal Akya Bond)
बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित झालेल्या सेलिब्रेशनमध्ये आक्या बाँड सहभागी झालेला या व्हिडिओत दिसत आहे. बनसोडे आणि आक्या यांनी एकमेकांना केक भरवत वाढदिवस साजरा केला. शेजारीच बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे हाही होता. हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सिद्धार्थच्या अकाउंटवरून हटविण्यात आला.
बनसोडे यांचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून पवार यांनी बनसोडे यांना सल्ला देत, आता विधानसभा उपाध्यक्ष असल्याने तुमच्या वागण्याकडे, बोलण्याकडे सर्वांचे बारीक लक्ष असेल. चिरंजीवांना देखील काही गोष्टी व्यवस्थित सांगितल्या पाहिजेत. आपण आता मोठ्या पदावर आहोत. त्यामुळे व्यवस्थित वागले पाहिजे, अशा शब्दांत कान टोचले होते. यानंतर आता वाढदिवसानिमित्त गुन्हेगाराने बनसोडे यांना केक भरवल्याने चर्चा रंगली आहे.
माझा वाढदिवस असल्याने अनेक जण मला भेटायला आले. त्यांनी केक, पुष्पगुच्छ आणला, शुभेच्छा दिल्या. ते कोण होते, याबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. मी प्रत्येकाला तुम्ही कोण आहात, हे विचारू शकत नाही. मी जनतेतील आमदार आहे, असे अण्णा बनसोडे यांनी सांगितले.