विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्रात उद्योगांना त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही.आमचे असोत, दादांचे असो की शिंदेंचे, कोणत्याही पक्षाचे लोक असोत, उद्योगांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर मोकासारखीच कारवाई करायची. खालची कारवाई करायची नाहीच, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ( Devendra Fadnavis orders, if anyone is bothering industries, take action like Mocca )
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय नवीन प्रशासकीय इमारत, पुणे पोलिस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण चिखली येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्याच्या भागामध्ये मधून मधून आम्हाला उद्योगांकडून तक्रारी येतात. आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केले जाते. आमच्याकडून वसुली केली जातेय. काहीही झाले तरी हे खपवून घ्यायचे नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण अधीक्षक तुम्हाला मी पूर्ण अधिकार देतोय. यातील काही आमचे लोक असतील, अजितदादांचे असतील किंवा शिंदेसाहेबांचे असतील. कोणत्याही पक्षाचे लोक असले तरी याबाबत कोणतेही कॉम्प्रोमाइज करायचे नाही. जर उद्योगांना कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकसारखीच कारवाई करायची. खालची कारवाई करायची नाहीच. काहीही झाले तरी महाराष्ट्रात उद्योगांना त्रास होऊ नये.
फडणवीस म्हणाले, पुणे जिल्हा हा महाराष्ट्राची उत्पादनाची राजधानी आहे. तंत्रज्ञानाची राजधानीही पुणे जिल्हा आहे. आज जगातील विविध लोकांशी आम्ही चर्चा करतोय. खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असताना उद्योगांना पोषक वातावरण ठेवण्याची आपली जबाबदारी आहे. पोलिस हे काम करतील असा मला विश्वास आहे.