विशेष प्रतिनिधी
मुंबई : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरले आहेत. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आरोप कोर्टाने अंशत: मान्य केले आहेत. दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश फॅमिली कोर्टाने दिले आहेत.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. “करुणा मुंडे या फॅमिली कोर्टात ४ फेब्रुवारी रोजी केस जिंकल्या त्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचे अभिनंदन. मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही आणि ही वैयक्तिक टीका नाही ह्याची नोंद घ्यावी. करुणा, ह्या धनजय मुंडे यांच्या पत्नी आहेत. त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा. कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि दोन लाख रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.” अशा आशयाची पोस्ट दमानिया यांनी केली आहे.
कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोर्टातून मला न्याय मिळाला, न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मुलं सोबत असल्यानं तिघांना प्रत्येकी 5 लाख मिळतील अशी मागणी होती. मला दोन लाख मिळाले आहेत. माझ्या मागणीसाठी मी हायकोर्टात जाणार असल्याचेही करुणा शर्मा यांनी यावेळी म्हटलं आहे.