विशेष प्रतिनिधी
मुंबई : धनंजय मुंडे यांना सत्यमेव जयते असे म्हणणे शोभत नाही. ते कोणत्याही अंगाने क्लिन अर्थात स्वच्छ नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ( Dhananjay Munde is not clean in any way he should not be given a chance in the cabinet again Anjali Damania demands from the Chief Minister)
माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषि खात्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी मिळालेल्या कथित क्लीनचिटवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. धनंजय मुंडे हे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ नका, असे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला बजावले आहे. त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला वरच्या कोर्टात आव्हान देण्याचेही संकेत दिलेत.
अंजली दमानिया म्हणाल्या की, हायकोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलासा दिला. पण मी त्यांनी घोटाळा केल्याच्या माझ्या दाव्यावर ठाम आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्रुटी शोधून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी शासनाच्या वकिलांनी अत्यंत हुशारीने हे प्रकरण मांडले. या प्रकरणी जे दोन जीआर होते ते वेगवेगळ्या विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा हा युक्तिवाद चुकीचा होता. या प्रकरणात कुठेही भ्रष्टाचाराचा उच्चार करण्यात आला नाही. भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रीपद असताना कृषी विभागात 200 कोटींचा घोटाळा झाला आहे असा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता. मात्र, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना निर्दोष म्हटले आहे.
धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेती पूरक साहित्य खरेदीसाठी राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याच्या थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की, परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. मला यामध्ये काही त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत. शासनाकडचे जे वकील होते त्यांनी अतिशय शातीरपणे सगळं मांडलं. जे दोन जीआर होते, ते वेगवेगळ्या विभागाचे आहेत, असं त्यांनी मांडलं. वकिलांनी जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे. या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चार देखील करण्यात आला नाही.
भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेला नाही. यामुळे धनंजय मुंडेंना अजून कोणत्याही प्रकारची क्लीन चीट मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाला चॅलेंज करायची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे. माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे. सत्यमेव जयते हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. व्ही. राधा ज्या सचिव होत्या, त्यांचा अहवाल कधीही मांडण्यात आला नाही. त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. आठ वेळा सचिवाने सांगितलं की, हे सर्व चुकीचं होतं आहे असा आरोप दमानिया यांनी केला.