विशेष प्रतिनिधी
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बॅकफूटवर गेलेले मंत्री धनंजय मुंडे आता त्यांच्या नेहमीच्या शैलीत मैदानात उतरले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे काही बरं वाईट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता. त्यांच्यावर पलटवार करताना मुंडे यांनी म्हटले आहे की कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील, त्यामुळेच क्षीरसागर यांना आंधळे विषयी अधिक माहिती असेल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आल्यावर वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला.तरीही त्याला अनेक सोयी-सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर मुंडे म्हणाले, कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील, त्यांचे संबंध असतील, त्यामुळेच क्षीरसागर यांना आंधळे विषयी अधिक माहिती असेल.
मीडियाच्या मायक्रो मायक्रो कॅमेऱ्यांना जे दिसले नाही, ते क्षीरसागर यांना दिसत असल्याने आंधळे आणि क्षीरसागर यांच्यात संबंध असल्याचा टोलाही मुंडे यांनी मारला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत, त्यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दिले. त्यानंतर आज मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी चर्चा होती. तर कॅबिनेटच्या बैठकीला मुंडे उपस्थित होते. त्यांनी राजीनाम्याविषयी बाजू मांडली. दमानिया यांनी जे काही पुरावे दिले. त्याविषयी अधिक न बोलता त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली, असे त्यांनी स्पष्ट केले. कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री धनजंय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.