विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये भारताने पाकव्याप्त बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला होता आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने ठाम भूमिका घेतली होती. मात्र आता काँग्रेसचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी या एअर स्ट्राईकवर संशय व्यक्त करून नवा वाद पेटवला आहे.
( Did anyone see the Balakot air strikeControversial statement by former Congress Chief Minister Channi)
“देशात कुणीही बालाकोट एअर स्ट्राईक पाहिलं नाही. जर आपल्या देशात बॉम्ब पडला असता, तर आपल्याला नक्कीच समजलं असतं. मग पाकिस्तानात बॉम्ब टाकल्याचा दावा करताय, तर त्याचा कुठे आहे पुरावा?” असा प्रश्न त्यांनी विचारत थेट मोदी सरकारच्या दाव्याचं खंडन केलं.
चन्नींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत असून, लष्कराच्या शौर्याबाबत अशा शंका उपस्थित करणं ही राष्ट्रविरोधी भूमिका असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
चन्नींनी यावर पुढे जात पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरूनही मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “ही वेळ मौन बाळगण्याची नाही. ही जखम भरवण्याची आहे. दोषींना तात्काळ शोधा आणि कठोर शिक्षा द्या,” अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी या हल्ल्याला सुरक्षा यंत्रणांची मोठी चूक ठरवत, यामध्ये २६ नागरिकांचा बळी गेल्याची आठवण करून दिली.
तथापि, चन्नींनी स्पष्ट केले की काँग्रेस पक्ष दहशतवादविरोधी कारवाईत सरकारसोबत खंबीरपणे उभा आहे. मात्र, त्यांनी हेही सांगितले की, “समर्थन देणं म्हणजे सरकारवर प्रश्न विचारायचे अधिकार गमावणे नव्हे.”
तसेच, हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना केवळ सांत्वन नव्हे, तर भरघोस भरपाई आणि योग्य पुनर्वसन दिले जावे, अशी जोरदार मागणीही त्यांनी केंद्राकडे केली.
या पार्श्वभूमीवर, राजकीय वर्तुळात हा प्रश्न उपस्थित होतो आहे की काँग्रेस पक्षाची भूमिका नेमकी काय आहे ? राष्ट्रीय सुरक्षेबाबत एकसंघ पाठिंबा की अंतर्गत विरोधातून निर्माण होणारे संभ्रम? निर्माण करायचे आहेत.