विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे. ( Discussion of successor is Mughal culture Chief Minister tells Sanjay Raut)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल. संघाची चर्चा बंद दाराआड असते. ती बाहेर येत नसते. तरीही काही संकेत असतात ते स्पष्ट आहेत, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
संजय राऊत यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही, मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरीच वर्ष ते काम करणार आहेत, आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे , 2029 चे पंतप्रधान म्हणून आम्ही नरेंद्र मोदी यांच्याकडेच पाहतो आहोत. पूर्ण देशही तेच बघत आहे, त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आत्ता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही. जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध नाही.
राऊत म्हणाले, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघाची एक भूमिका आहे. त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी यावी ही संघाची भूमिका मला स्पष्टपणे दिसतेय. ज्या अर्थी मोदींना 10-11 वर्षानंतर नागपुरात जाऊन सरसंघचालकांना भेटावं लागलं ही काही साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षात गेले नाहीत. नड्डा यांनी संघाची गरज नाही अशी भाषा केली होती. जेव्हा भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो तेव्हा ती पंतप्रधान मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता, तेव्हा मोदींना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे.