विशेष प्रतिनिधी
नागपूर : उपराष्ट्रपती जगदिप धनखड, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही सर्वाेच्च न्यायालयाला सुनावले आहे. कायदे तयार करणे हे संसदेचे काम आहे. संसदेत बहुमताने कायदा मंजूर झाला असेल तर सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या चौकटीत राहूनच आपले मत व्यक्त करावे. स्वत:ला सुप्रीम समजू नये. जेथे कायदे तयार होतात, ती संसद हीच सुप्रीम आहे, आठवले म्हणाले.
( Dont consider yourself Supreme Ramdas Athawale also told the Supreme Court)
नागपूर येथे पत्रकार परिषदेत बाेलताना आठवले म्हणाले, केंद्र सरकारने सुधारित केलेला वक्फ बोर्ड कायदा हा मुस्लीम बांधवांच्या हिताचा आहे, परंतु विरोधक याचे राजकीय भांडवल करीत आहेत, ते मुस्लीम बांधवांची दिशाभूल करीत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन भारताच्या विरोधात बोलू नये,
मराठीच्या नावावर दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करत आठवले म्हणाले, राष्ट्रभाषेला विरोध करणे योग्य नाही. मराठीचा आग्रह धरणे ठिक आहे. परंतु दादागिरी करीत लोकांना त्रास देणे योग्य नाही, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई करावी.
इंग्लंडप्रमाणे अमेरिकेतही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे, अशी अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेलो हेतो. बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेल्या तेथील कोलंबिया विद्यापीठासह इतरही काही भागात भेटी दिल्या. तेव्हा तेथील नागरिकांकडून तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार व्हावे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.