विशेष प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, संत तुकाराम महाराजांचे वंशज व्यासपीठावर असताना, तसेच संतपीठासारख्या चांगल्या कार्यक्रमात भाजपचे आमदार महेश लांडगे तमाशाच्या फडात बोलल्याप्रमाणे वक्तव्य केले. ते एका विधीमंडळाच्या सदस्याला न शोभणारे आहे. त्यांनी अजित पवारांबद्दल बोलताना तेच त्यांचे राजकारणातील वस्ताद आहेत. हे विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. ( Dont forget that your Vastad is Ajitdada NCP warns MLA Mahesh Landge)
चिखलीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या संतपाठीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी व भाजपच्या श्रेयवादावरून टीका केली. त्यावेळी त्यांनी “मी पैलवान आहे, कोणाला घाबरत नाही, मला अंगावर घेण्याची सवय आहे”, अशी भाषा वापरत पालकमंत्री अजित पवार यांनाच आव्हान दिल्याची चर्चा होत आहे.
यानंतर तातडीने राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, महेश लांडगे हे अजितदादा किंवा माजी आमदार विलास लांडे यांच्याबदद्ल बोलले, हे माहित नाही. परंतु, त्यांनी ते पैलवान कोणामुळे झाले, त्यांचा वस्ताद कोण आहे? तुमचा राजकीय उदय कोणामुळे झाला, हे विसरू नये. मुख्यमंत्री फडणवीस यांना ही त्यांचे भाषण आवडले नाही. त्यांनी ही कान टोचले.
चांगल्या व्यासपीठावरून भाषणात कोणती भाषा वापरावी, हा संस्काराचा भाग आहे. अशा प्रकारामुळे त्यांच्याबरोबर शहराची, पक्षाची प्रतिष्ठा कमी होते. अजितदादांबद्दल ते इतके कृतघ्न असतील, तर जिथे आहेत. तिथेही तेच करतील. त्यांनी अकलेचे तारे तोडणे योग्य नाही. वातावरण कलुषित करू नये. ज्या पध्दतीने ते बोलले. त्यावरून त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, अशीही टीका पाटील यांनी केली.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक नाना काटे, डब्बू आसवानी, शाम लांडे, राहूल भोसले, पंकज भालेकर युवक शहराध्यक्ष शेखर काटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, फजल शेख, आदी उपस्थित होते.