विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस सरकारच्या काळात मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला तुरुंगात मटण, बिर्याणी खाऊ घालण्यात आली. आता मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला कसाबसारखी वागणूक न देता मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीमुंबई दहशतवादी हल्ल्यातील एका पीडितेने केली आहे. ( Dont give biryani like Kasab give death penalty to Tahawwur Rana demands Mumbai terror attack victim)
राणाला घेऊन एनआयए पथक दिल्लीत पोहोचणार आहे. राणाच्या प्रत्यर्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचे विशेष पथक अमेरिकेत पोहोचले होते. त्यानंतर त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मुंबईतील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ओळखणाऱ्या प्रमुख साक्षीदार आणि पीडित देविका रोटावन यांनी पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाबद्दल आनंद व्यक्त केला. भारत आणि अमेरिकन सरकारचे त्यांनी आभार मानले आहे. त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. तसेच, ताज पॅलेस हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले राज्य राखीव पोलिस दलाचे कॉन्स्टेबल राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांनीही दहशतवाद्यांना तुरुंगात टाकू नका, त्याला कसाबसारखी वागणूक नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. या हल्ल्यात ज्यांच्या सतर्कतेमुळे अनेकांचे जीव वाचले त्या मोहम्मद तौफिक चहावालानेही, ‘मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला देण्यात आलेल्या तुरुंगवास, बिर्याणी आणि अशा इतर सुविधा तहव्वूर राणाला द्यायची गरज नाही,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
गुरुवारी म्हणजेच 10 एप्रिलला तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे. त्याच्यासाठी मुंबई तसेच दिल्लीतील दोन कोठड्या तयार करण्यात आल्या आहेत. दिल्लीत आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबईमध्ये आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात. तहव्वूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला मिळाली आहे. दरम्यान, तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएची 7 सदस्यांची विशेष टीम स्थापन करण्यात आली आहे. त्यात काही वरिष्ठ वकीलही आहेत.