विशेष प्रतिनिधी
मुंबई : महायुतीतील वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत हजेरी घेतली आहे. आपल्यातल्या आपल्यात महायुतीत वाद होईल, अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका. टीका करायला संधी देऊ नका अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
( Dont give the baton to the opposition Chief Ministers stern warning to those making controversial statements)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी बुधवारी रात्री महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला.
भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना पावसाळी अधिवेशनाच्या काळात सतर्क राहा. महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा’, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचसोबत भाजपमधील वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या.
महायुतीच्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
अधिवेशनात सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे. सर्व आमदारांनी अधिक सक्रिय व्हावे. आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून जनतेची कामे करावीत. सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे, अशा प्रकारच्या सूचना महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे व हसन मुश्रीफ उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी जल्लोष मेळाव्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.