विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मराठी-अमराठी वाद पुन्हा चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माध्यमांशी कोणताही संवाद साधू नये, तसेच सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. यामध्ये अधिकृत प्रवक्त्यांनाही राज ठाकरे यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही वक्तव्य देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ( Dont interact with the mediamaintain silence on social media too Raj Thackeray’s strict order to MNS workers)
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या भूमिकेमुळे मराठी-अमराठी मुद्द्यावर राज्यात वातावरण तापले आहे. ‘हिंदी सक्ती’च्या विरोधात दोन्ही पक्षांनी उघड भूमिका घेतल्यानंतर सरकारने संबंधित निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र मेळावा झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर, मनसेचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपापल्या स्तरावर माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत आहेत, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आहेत. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका गोंधळात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी आता “माध्यमांशी किंवा कोणत्याही डिजिटल प्लॅटफॉर्मवर संवाद साधू नये, प्रतिक्रिया देऊ नयेत, स्वतःचे व्हिडिओ वा मत सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत,” असा सक्त आदेश काढला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.
२ जुलै रोजी मनसेच्या एका कार्यकर्त्याने मीरा-भाईंदरमध्ये एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर हजारो हिंदी भाषिकांनी मोर्चा काढला होता. भाजपाचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा आरोप करत मनसेने त्याच्या प्रत्युत्तरात मराठी भाषिकांचा मोर्चा आयोजित केला. मात्र पोलिसांनी यास परवानगी नाकारत कलम १४४ लागू केल्याने अनेक मनसे नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले.
मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करूनही मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आणि शेवटी मोर्चा निघाला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, या घटनेनंतर मनसेच्या आंदोलनाला मराठी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर, पक्षाची प्रतिमा, संदेश आणि रणनीती या बाबतीत एकवाक्यता टिकवण्यासाठीच राज ठाकरे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.