विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली आहे. राज्याची अर्थव्यवस्था १२ लक्ष कोटी रुपयांवरून चाळीस लक्ष कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक घौडदौडीचा लेखाजोखा मांडला. ( During Modis tenure the economy grew from Rs 12 lakh crore to Rs 40 lakh crore the Chief Minister presented an account of Maharashtras economic boom.)
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या (MACCIA) शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर यशाची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, देशात सर्वाधिक ‘एमएसएमई’ महाराष्ट्रात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या व महाराष्ट्राच्या विकासात मोठे परिवर्तन झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. कारण 2013-14 साली महाराष्ट्राचा जीएसडीपी (ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट) ₹12 लाख कोटी होता, तो 2019 पर्यंत दुपटीने वाढून ₹25 लाख कोटींवर गेला आणि आता तो ₹40 लाख कोटींपेक्षा अधिक झाला आहे. म्हणजे, गेल्या 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व आपल्या सर्वांच्या कर्मण्यतेने परिवर्तन झाले आहे. अशा प्रकारे जास्तीत जास्त गुंतवणूक, व्यापाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार संधी तयार करण्यासाठी व शेती क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी आपण काम करु, महाराष्ट्राला सदैव पहिल्या क्रमांकावर नेऊ.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर संस्थेने उद्योग, व्यापार आणि शेतीच्या क्षेत्रात नवे उद्यमी तयार करण्याची मुहूर्तमेढ रोवली. देशात अनेक चेंबर ऑफ कॉमर्स/इंडस्ट्री नाव असलेल्या संस्था आहेत. पण कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर असे एकत्रित नाव असलेली ही एकमेव संस्था असून, याच संस्थेच्या माध्यमातून ‘फिक्की’सारख्या संस्थेची संस्थेची निर्मिती झाली. अशा प्रकारे उद्योग व व्यापाराचे भारतीयीकरण करण्याच्या हेतूने 100 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही संस्था आज अतिशय गौरवाने उभी आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आज येथे शेठ वालचंद हिराचंदजी यांचे स्मरण अतिशय महत्त्वाचे आहे, कारण देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भूमिपुत्रांपैकी ते एक आहेत. त्यांनी या संस्थेची निर्मिती केली व हजारो लोकांना प्रेरणा दिली. लोकांना ‘फियाट’ माहिती होती, त्या काळात संपूर्ण भारतीय बनावटीची ‘प्रीमियर पद्मिनी’ कार तयार करण्याचे काम शेठ वालचंदजी यांनी केले होते. शेठ वालचंदजी यांनी स्थापन केलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड किंवा हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपन्या आज राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर देशाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या दोन्ही कंपन्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, शेठ वालचंदजी यांनी रोपटे लावलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर या संस्थेचे आताचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात या संस्थेसाठी 100 वे वर्ष ऐतिहासिक ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य बनले आहे. मे महिन्याच्या जीएसटी संकलनात महाराष्ट्र देशात सर्वात पुढे असून ₹31 हजार कोटींचे संकलन झाले आहे. तसेच पुढील क्रमाने, तिन्ही राज्यांचे एकत्रित जीएसटी संकलन ₹35 हजार कोटी आहे. महाराष्ट्रात देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 31% FDI आली असून हा एक ऐतिहासिक विक्रम बनला आहे. महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगाने वाटचाल सुरू असून, हाफ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा पार केलेले महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. हे सर्व आपल्या सर्वांमुळे शक्य झाले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.