विशेष प्रतिनिधी
मुंबई : मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीयबॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. डिनो मोरियासह त्याचा भाऊ सॅन्टिनो मोरिया यांच्यावर देखील संशयाची सुई आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे छापे मुंबई आणि केरळमधील एकूण 15 हून अधिक ठिकाणी एकाचवेळी टाकण्यात आले. या प्रकरणी आधीच आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरु होती. ( ED raids house of actor Dino Morea close to Aditya ThackerayInvestigation into embezzlement of Rs 65 crores in Mithi River scam case begins)
मुंबई महापालिकेच्या (BMC) मिठी नदी गाळ उपसा प्रकल्पात सुमारे 65.54 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. हा प्रकल्प 2019 ते 2022 या काळात राबवण्यात आला होता. आरोपानुसार, कंत्राटदार, मध्यस्थ आणि पालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून काम पूर्ण केल्याचे दाखवले, पण प्रत्यक्षात गाळ उपसा पूर्ण न करता फसवणूक केली.
या प्रकरणात तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन एजंट, आणि दोन खाजगी कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी काहीजण सध्या ईडीच्या आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत.
डिनो मोरिया – केतन कदम आर्थिक संबंधात
या घोटाळ्यात अटकेत असलेल्या केतन कदम या मुख्य आरोपीचे नाव अनेक आर्थिक व्यवहारांसाठी समोर आले आहे. तपासात असे समोर आले आहे की, केतन कदम आणि डिनो मोरियामध्ये 2019 ते 2022 दरम्यान अनेक आर्थिक व्यवहार झाले. त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने डिनो आणि त्याचा भाऊ सॅन्टिनो यांची जवळपास ८ तास सखोल चौकशी केली होती.
या संदर्भात डिनो मोरियाला आर्थिक दस्तऐवजांसह हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. ईडीकडून त्याचे मोबाईल डेटा, बँक व्यवहार, कंत्राटदारांशी संबंध आणि निधीचे प्रवाह यांचा तपास केला जात आहे.
डिनो मोरिया हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवानेते आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.