विशेष प्रतिनिधी
मुंबई : एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या अजय अशरने मधल्या काळात हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीपणे गोळा केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशर देश सोडून पळून गेला आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, असे अनेक लोक पळाले आहेत. आता अशर पळाला आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ( Eknath Shinde’s close aide Ajay Ashar fled the country, claims Sanjay Raut)
राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण व्यवहार पाहणे, जमिनीचे व्यवहार करणे, त्यांच्या पैशांचे संरक्षक म्हणून अशरची ओळख आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, आमदारांना विकत घेण्यात आले तेव्हा अशर, भाजपचे सुरतचे खासदार आणि मुंबईतल्या काही ठेकेदारांनी आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. अशरने मधल्या काळात हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीपणे गोळा केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशर देश सोडून पळून गेला आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, असे अनेक लोक पळाले आहेत. आता अशर पळाला आहे.”
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ संस्था तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केली होती. ‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय अशर या बिल्डरची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र त्यांना या पदावरून हटविण्यात आले आहे.
यावर संजय राऊत म्हणाले, “उद्योजकांच्या समितीवर प्रवीण परदेशींची नेमणूक होणे, याचे आम्ही स्वागत करतो. अशर हा ठाण्यातील बिल्डर होता. त्याचे उद्योग सर्वांना माहिती आहेत. अशरने मधल्या काळात हजारो कोटींची संपत्ती बेकायदेशीपणे केली आहे. कोणीतरी राणा नावाचा अतिरेकी आहे. त्याला भारतात आणण्यासाठी चर्चा सुरू आहे. मग, अशा आर्थिक गुन्हेगारांना परत कधी आणणार? अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे. त्याने माजी मुख्यमंत्र्यांसाठी कुठे आणि किती पैसा गोळा केला? किमान दहा हजार कोटी रूपये घेऊन हे महाशय परदेशात स्थायिक व्हायला गेले आहेत. अशरकडे सध्याच्या सरकारमधील अनेकांनी पैसे गुंतवले आहेत. फडणवीसांनी अशा व्यक्तीला मित्र संघटनेतून दरू करून चांगल्या अधिकाऱ्याला आणले असेल, तर त्याचे स्वागत केले पाहिजे.
अशर आणि त्याचे राजकीय आका ईडीची फिट केस आहे. मात्र, ईडी त्यांच्याकडे पोहोचणार आहे का? गृहमंत्रालयाने अशरवर गुन्हे दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी राऊतांनी केली.
एकनाथ शिंदेंना पंख कधीच नव्हते. ते फक्त उड्या मारायचे. पंख असलेला माणूस हा गरूड झेप घेतो. अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करत नाही. त्यामुळे शिंदेंचे पंख छाटले जात आहेत, हे मला मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली पाहिजे, असेही राऊत म्हणाले.