विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : दाढीवर कितीही टीका केली तर याच दाढीनं तुमची मग्रुरी जिरवली. दाढीनं महाभकास आघाडीची गाडी खड्ड्यात घातली, हे विसरु नका, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ( Eknath Shindes Sharp Criticism on Mahavikas Aghadi)
कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात आयोजित आभार सभेत एकनाथ शिंदे शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, सत्तेसाठी इमान विकणाऱ्या, बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड करणाऱ्या उबाठाला कोल्हापूरकरांनी विधानसभा निवडणुकीत कायमचं फेकून दिले. महायुतीचा स्ट्राईक रेट इतका जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर काय भूमिका घ्यायची यावर त्यांचा गोंधळ उडाला. काही लोकांचा चेहरा भोळा असतो पण भानगडी सोळा असतात. अशांना कोल्हापूरकरांनी निवडणुकीत तडीपार केले. काहींनी मला हलक्यात घेतलं. मी शांत आहे, शांततेत काम करु द्या, पण मला कोणी छेडलं तर मी सोडत नाही. असा इशाराही शिंदे यांनी दिला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महायुतीच्या 10 पैकी 10 जागा निवडून आल्या. कोल्हापूरकरांना 100 टक्के मार्क मिळाले. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे. इथला कोणी नाद करायचा नाय आणि हे कोल्हापूरनं निवडणुकीत दाखवून दिलं. पहिल्यांदाच राधानगरी भूदरगडला मंत्री मिळालं, पालक मंत्रीपद मिळालं आणि आरोग्य खातं सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्यानं आरोग्य आणि शिक्षण खातं शिवसेनेकडं मागून घेतलं, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.