विशेष प्रतिनिधी
पुणे: कोथरूडमध्ये एका सदनिकेत ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडली. या महिलेने पेटवून घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. ( Elderly woman found burnt in apartment suicide suspected)
कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. घुगे या कोथरूड मधील गुरूगणेशनगर भागातील एका सोसायटीत राहण्यास आहे.
सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घुगे यांच्या घरातून धूर येत असल्याचे सोसायटीतील रहिवांशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला संपर्क साधला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा दरवाजा जवानांनी उघडला. तेव्हा घुगे गंभीरिरत्या होरपळल्या होत्या. सदनिकेतील साहित्याला आग लागली नव्हती. घुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घुगे एकट्या सदनिकेत राहायला होत्या. त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतली होती, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी दिली.
कमल घुगे यांनी पेटवून घेत आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या सदनिकेत एकट्याच राहत होत्या. कोथरूड पोलीस पुढील तपास करीत आहेत.