विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुण्यातील आयसिस स्लीपर मॉड्यूल कटातील आणखी एक प्रमुख संशयित रिझवान अली उर्फ अबू सलमा उर्फ मौला याला राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने अटक केली आहे. या प्रकरणात अटक झालेला तो अकरावा आरोपी आहे. त्याच्यावर ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते आणि त्याच्या अटकेसाठी विशेष NIA न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले होते. ( Eleventh suspect Rizwan arrested in Pune ISIS sleeper module case NIA takes major action)
NIA च्या तपासात समोर आले आहे की, रिझवान अली इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (ISIS) या बेकायदेशीर दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी कटात सक्रीय होता. त्याने देशात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हिंसाचार आणि दहशतीद्वारे भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला होता.
रिझवान अलीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी दहशतवादी अड्डे निर्माण करण्यासाठी रेकी केली होती. तसेच त्याने इतर आरोपींसोबत मिळून शस्त्र प्रशिक्षण शिबिरे घेतली, गोळीबार प्रशिक्षण दिले आणि आयईडी (Improvised Explosive Devices) तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले होते.
या प्रकरणात आतापर्यंत खालील दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे : मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नासिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बारोडावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन, शहनवाज आलम, अब्दुल्ला फैज शेख, तल्हा खान.
सर्व आरोपींविरोधात UA (P) Act, स्फोटक पदार्थ कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणातील तपास NIA कडून अजूनही सुरु असून देशात दहशत पसरवणाऱ्या आयसिससारख्या संघटनांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यापक स्तरावर कारवाई करण्यात येत आहे.