विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या एककल्ली कारभाराविरोधात बंडाचा आवाज उठला आहे. पक्षातील असंतोष अखेर उफाळून आला असून, पक्षाचे १५ नगरसेवक एकत्र येत ‘आप’च्या नेतृत्वाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. या सर्व नगरसेवकांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून नवीन ‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. (Elgar against Kejriwals one-man rule 15 AAP corporators resign)
या बंडाचे नेतृत्व हेमचंद्र गोयल करत असून, मुकेश गोयल हे नवीन पक्षाचे प्रमुख नेते असतील. राजीनामा देणाऱ्यांमध्ये रुनाक्षी शर्मा, हिमानी जैन, दिनेश भारद्वाज, उषा शर्मा, राखी यादव, साहिब कुमार, अशोक पांडे, सुमन राणा, मनीषा, देवेंद्र कुमार यांचाही समावेश आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पक्ष आता कार्यकर्त्यांचा नाही, केवळ केजरीवाल आणि त्यांच्या जवळच्या लोकांचा झाला आहे. ‘आप’ आता लोकशाहीच्या मार्गावर नाही.”
गेल्या महिन्यात झालेल्या एमसीडी निवडणुकीवर ‘आप’ने बहिष्कार टाकला. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. भाजपचे राजा इक्बाल सिंह महापौरपदी निवडून आले आणि काँग्रेसचे उमेदवार मनदीप सिंग पराभूत झाले. ‘आप’च्या या निर्णयामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता हेच नेते थेट पक्षविरोधात उभे ठाकले आहेत.
मुकेश गोयल यांना ‘आप’ने आदर्श नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती, त्यांनी सांगितले की, “पक्षात बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही. आमच्यावर निर्णय थोपवले जात होते. आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जात होतो, पण केजरीवाल यांचं एकमेव उत्तर असायचं ‘पुढे बघू’.”
‘इंद्रप्रस्थ विकास पक्ष’ आता दिल्लीच्या स्थानिक प्रश्नांवर केंद्रित राहणार असून, स्थानिक प्रशासन, पाणी, रस्ते, शाळा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे बंडखोर नगरसेवकांनी सांगितले.
एकीकडे केजरीवाल यांच्यावर अनेक चौकशा सुरू असताना आणि दिल्ली सरकारवर विश्वासार्हतेचा प्रश्न उभा राहत असताना, हा अंतर्गत उठाव त्यांना अधिक अडचणीत टाकणारा ठरणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘आप’पुढे हा एक नवा राजकीय पेच उभा राहिला आहे.