विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कथित हिंदी सक्तीवरून विरोधकांकडून रान उठविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामन्यांना मराठीच्या मुद्द्यावर भावनिक केले जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला आहे. भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजावून घ्या आणि मराठी मुलांचे नुकसान करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ( Emotional politics or loss of Marathi children an introspective question from Chief Minister Devendra Fadnavis)
मराठी आणि हिंदीमध्ये स्पर्धा झाली तर पहिली मराठीच निवडली जाईल. मराठी सोबत कोणतीही स्पर्धा नाही असे स्पष्ट करताना अत्यंत महत्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील संस्थांमध्ये ॲडमिशन तुम्ही ठरवाल. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये सर्व निवड सीईटीने होत आहे. यात आपण मराठी मुलांचे नुकसान करत आहे. हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे.
परकीय भाषा चालते मग भारतीय हिंदी का चालत नाही असा सवाल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यामागे एक सायंटिफिक प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजे, या दृष्टिकोनातून तयार केलेले त्रिभाषा सूत्र आहे. ते तयार करत असताना विद्यार्थ्यांची बुद्धी सर्वात जास्त कधी चालते, भाषा शिकण्याची शक्यता कधी अधिक असते. या संदर्भातले रिसर्च करून त्या कालावधीमध्ये त्यांना भाषा शिकवल्या तर ते अधिकच्या भाषा शिकू शकतात, अशा प्रकारचा मुद्दा समोर आला. हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. कुठलीही भाषा शिका, हिंदीच शिकली पाहिजे असे नाही. हे आम्ही एका मिनिटात सांगितले. हिंदी सक्तीला यांचा विरोध नाही तर यांचा विरोध केवळ हिंदीला आहे. भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तीला तुमचा विरोध नाही. परकीय भाषा चालते मग भारतीय हिंदी का चालत नाही?
आमच्या मुलांना तीन भाषा शिकायच्या आहे. तीन भाषा शिकले नाही तर नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे क्रेडिट मिळणार नाही. नवीन भाषा न शिकल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांचे क्रेडिट कमी होणार आहे. त्यामुळे चांगले मार्क घेऊन देखील राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये मराठी विद्यार्थ्याचा नंबर लागणार नाही. हे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मागे ओढण्यासारखे आहे, अशी चिंताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता.
मनसे प्रमुख राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून काय झाले? मात्र त्यांच्या काही भूमिका आहेत. तर माझ्या काही भूमिका आहेत. सर्वांच्या सारख्या भूमिका असत्या तर सर्व एका पक्षात राहिले असते. त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरोधात ते बोलताय, तर याचा अर्थ केवळ राजकीयच आहे. या राज्यात माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करायचय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय. मात्र या लोकांना देखील राजकारण करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा लोकांनी जर एखादा रिपोर्ट दिला आणि तो तुम्ही स्वीकारला आहे. आता तुम्ही त्यालाच विरोध करता? याचा अर्थ मराठीचा प्रेम नाही तर राजकारण असल्याचा स्पष्ट आरोप देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
गुजरातमध्येही तिसरीपासून हिंदी भाषा
महाराष्ट्रातील काही विद्वानांनी गुजरातमध्ये तिसरी भाषा शिकवली जाते का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, गुजरात राज्यामध्ये देखील तिसऱ्या वर्गापासून हिंदी भाषा शिकवली जात आहे. हिंदीला त्यांनी संस्कृत आणि इतर भाषांचे देखील पर्याय दिलेले आहेत. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषेवरून गुजरातकडे बोट दाखवणाऱ्या नेत्यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे.