पिरंगुट : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असताना, पुणे जिल्ह्यातील पिरंगुट गावातील ग्रामस्थांनी सुरक्षेच्या कारणास्तव एक मोठा निर्णय घेतला आहे. गावातील मशिदीत आता बाहेरील मुस्लिमांना नमाजासाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गावातील एक मे रोजी झालेल्या ग्रामसभेत करण्यात आली असून त्याबाबत मशिदीजवळ फ्लेक्स लावून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
( Entry of outside Muslims to the mosque in Pirangut village is prohibitedVillagers decision is based on security reasons)
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पिरंगुट येथील मशिदीत अलीकडच्या काळात क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होऊ लागली होती. गर्दीतील अनेक व्यक्ती कोण आहेत, हे ओळखपत्रांशिवाय स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेणे आवश्यक होते, असे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.
ग्रामसभा व बैठकीला गावातील मुस्लिम बांधवही उपस्थित होते, असे सांगण्यात आले. पोलिस पाटील प्रकाश पवळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “गावातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी मशिदीतील गर्दीमुळे रस्त्यावरून जाणे कठीण होत होते. तक्रारीनंतर चौकशी केली असता, मौलानांनी स्पष्ट केलं की, गर्दीमधील बरेच लोक बाहेरचे आहेत आणि अलीकडेच येऊ लागले आहेत. त्यामुळे गावाच्या सुरक्षेचा विचार करून ग्रामसभेत फक्त स्थानिक मुस्लिम बांधवांना मशिदीत प्रार्थनेची परवानगी द्यायचा निर्णय घेण्यात आला.”
मात्र या निर्णयावर आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिरंगुट मशिदीचे पदाधिकारी आमिर यांनी या निर्णयावर आक्षेप घेत “आम्ही बैठकीला उपस्थित होतो, मात्र असा ठराव होणार आहे, हे आम्हाला आधी सांगण्यात आले नव्हते” असा दावा केला आहे. तसेच, “धर्मस्थळांवर कोणी कशी बंदी घालू शकतो?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर असे नमूद करण्यात आले आहे की
“पिरंगुट गावातील मशिदीत फक्त स्थानिक मुस्लिम बांधवांनाच प्रार्थनेसाठी परवानगी राहील. अन्य परप्रांतीय, पंचक्रोशीतील किंवा व्यवसायासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी मशिदीत येण्यास आणि नमाजासाठी उपस्थित राहण्यास प्रतिबंध आहे. गर्दीमुळे गावातील कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.”