विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : सगळंच उद्ध्वस्त झालंय, अशी शोकाकुल प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद येथे विमान अपघात स्थळाला भेट दिल्यावर व्यक्त केली. सिव्हिल रुग्णालयात गेले अपघातात जखमी झालेल्यांची त्यांनी विचारपूस केली. या अपघातात वाचलेल्या विश्वास कुमार रमेश यांची देखील पंतप्रधान मोदी यांनी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. ( Everything is destroyed PM Narendra Modi mourns after visiting the plane crash site)
रुग्णालयातील सी 7 वॉर्डमध्ये 25 जखमींवर उपचार सुरू आहेत. सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांशी देखील त्यांना चर्चा केली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी यांच्यासह अनेक बडे मंत्री तसेच अधिकारी उपस्थित होते. विमान अपघात झाला त्या ठिकाणी तसेच रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्याची माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदी यावर म्हणाले, अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामुळे आम्ही सगळेच दुःखी आहोत. एवढ्या लोकांचा अचानक आणि अशा भयानक पद्धतीने झालेला मृत्यू सगळ्यांनाच निःशब्द करून गेला आहे. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रति आमच्या संवेदना आहेत. आम्ही त्यांच्या भावना समजू शकतो. प्रियजनांना गमावल्याने त्यांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती एवढ्या लवकर भरून निघणे शक्य नाही, असेही पंतप्रधान म्हणतात.
दुसऱ्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात, अहमदाबाद येथील विमान अपघात झालेल्या ठिकाणी आज भेट दिला. सगळंच उद्ध्वस्त झालंय. अधिकारी तसेच अन्य टीम अथक परिश्रम करत आहेत.
गुरुवारी दुपारी हा भीषण अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी एअर इंडियाच्या या विमानाने उड्डाण केले. आणि अवघ्या काही सेकंदात ते बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीला जाऊन धडकले. विमानात केबिन क्रू, पायलटसह 242 जण होते. यातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे देखील निधन झाले आहे. विशेष म्हणजे, यात एकच प्रवासी वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.